Saturday, July 21, 2007

वारीचा अन्वयार्थ ....

गावोगावच्या दिंड्या "ज्ञानोबा- तुकाराम' म्हणत लाडक्‍या विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपुराकडे झेपावू लागल्या आहेत. महाराष्ट्राच्या मातीत शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. दर्शनाला जायचे विठोबाच्या आणि मुखाने गजर असतो तो "निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई । एकनाथ नामदेव तुकाराम ।।' या मंत्राचा. "पड, पड कुडी, गंगा-भागीरथीच्या तिरी' असे म्हणणारे मराठी मन आषाढात मात्र धाव घेते ते चंद्रभागेच्या तिरावर. अशी कोणती चिरंतन साद आहे, की जिला प्रतिसाद देण्यासाठी हजारो- लाखो लोकं सर्व सुख बाजूला ठेवून पायपीट करायला निघतात. मिळेल ते खातात, सापडेल तेथे राहतात. घरापासून ते पंढरीपर्यंतचे मैलोन्‌मैल अंतर चालून जाताना थकव्याच्या कोणताही लवलेश त्यांच्या चेहऱ्यावर नसतो. वारीच्या मुक्कामी भारूड रंगल्यास त्यात उड्या मारून आनंद व्यक्त करण्यातही हे वारकरी आघाडीवर असतात. सुखावर, सर्वसंगावर "वार' करणाऱ्या या भाविकांना भुरळ असते ती पंढरीची. पांडुरंगाच्या मुर्तीचे दर्शन दर्शन झाले नाही, तर केवळ कळसाच्या दर्शनानेही भरून पावतात. पुन्हा मनात प्रश्‍न येतो, की ज्या देवासाठी आकांत मांडला आहे, त्याचे नाव नंतर. आधी असते ते ज्ञानोबा- तुकारामांसारख्या संतांचं, समाजसुधारकांचं, की तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांना त्यांच्या भाषेत देव समजावून देणाऱ्या देवमाणसांचं. असे काय आहे या भक्तीत?दगड,धोंड्यात कुठे देव असतो का? असे अंधश्रद्धाळू मनांना खडसावून विचारणाऱ्या तुकोबांना वारकऱ्यांनी "जगद्‌गुरू'ची पदवी दिली आहे. तर कर्मकाडांना झुगारण्याचा संदेश देणारे आणि "देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या'' सांगणारे ज्ञानदेव वारकऱ्यांची माऊली ठरतात. कांदा, मुळा या भाज्यांना अवघी "विठाई' म्हणणाऱ्या सावता महाराजांचे अभंग तेवढ्याच आदराने दिंडीत गायले जातात. तर श्रीखंड्याला ज्यांच्या साठी चक्क हमाली करावी लागली, अशा एकनाथांचे भारूडच थकल्या-भागल्या वारकऱ्यांना मनोरंजनातून प्रबोधनाची ऊर्जा देत असतं. नैवेद्य खात नाही म्हणून डोके आपटून प्राण देण्याची धमकी देत जेवणासाठी प्रत्यक्ष देवाला दरडावणाऱ्या नामदेवाच्या रचना या वारकऱ्यांना का प्रिय आहेत, दळण-कांडणासाठी देवाला सांगणारी जनाबाई, वारकरी माता-भगिनींसाठी का आदर्शवत ठरते, असे विचारले तर? मुळात, या संतांच्या प्रबोधनाबद्दल आणि त्यांच्याबद्दलच्या जनमानसातील भावनांबद्दल प्रश्‍न उपस्थित करणेच योग्य ठरणार नाही. तरीही आजच्या लहानसहान गोष्टीवरून भावना भडकावल्या जाणाऱ्या काळात, देवाला माणसाच्या अधिक जवळ आणणाऱ्या संतांच्या विचारांबद्दल कुतुहल जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. युगानुयुगे मंदिराच्या गाभाऱ्या अडकवून ठेवलेल्या देवाला बाहेर काढून भक्तिभावाने माऊलीचं, भ्रात्याचं, सख्याचं रूप या संतांनी दिलेच शिवाय अभंगातून, नित्य नामजपातून त्या दिव्य रुपाची सर्वसामान्यांना अनुभूतीही दिली. शारिरीक आणि मानसिक उर्जा मिळवण्यासाठीचा आधार दिला. रुजवलाही. जीवन जगण्याचे धार्मिक अधिष्ठान देताना मनाच्या समृद्धीचे एका अर्थाने व्यवस्थापनही केले. रंजल्या गांजल्यांची सेवा आणि श्रमाला देव मानणे हा त्यातलाच विचार. हे सारे करताना भोळीभाबडी मने सश्रद्ध होतील परंतु श्रद्धापिसाट होणार नाहीत याचीही काळजी घेतली. प्रसंगी अभंग रचनेतून कोरडे ओढून, फटकारे ओढून प्रबोधनही केले. प्रबोधनाच्या या प्रभावळीत प्रत्येक समाजाचे, व्यवसायाचे प्रतिनिधित्व संतांच्या रुपाने दिसते. त्यातूनच मराठी मनांची कष्टाशी आणि देवाशी सांगड घातली गेली. या श्रमविठ्ठलाचा अभिषेक घामाच्या धारांनी व्हावा, यासाठी झटलेल्या संतांच्या प्रतिची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वारकरी विठोबाच्या आधी "ज्ञानोबा-तुकाराम'चा गजर करतात, असे म्हटले तर.......?

No comments: